YCMOU EVS 201 Book
आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात ‘पर्यावरण अभ्यास’ हा विषय सक्तीचा करावा असा निर्णय दिला आहे. त्यामुळे सर्वच विद्यापीठांनी हा विषय आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे. पर्यावरण हा विषय मानव आणि विश्व यांच्या जगण्याशी निगडित असलेला आणि महत्त्वाचा विषय आहे. आपल्या विद्यापीठानेही सर्वच पदवी शिक्षणक्रमांसाठी ‘पर्यावरण
अभ्यास’ या विषयाचा द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे. ‘पर्यावरण’ अभ्यासक्रमातून आपण पर्यावरणविषयक विविध संकल्पनांचे अध्ययन करणार आहात, तसेच जागतिक व स्थानिक समस्यांचा अभ्यासही करणार आहात. पर्यावरण हा विषय आपणास नवीन नाही. आपल्या अवतीभोवती सातत्याने अनेक बदल घडताना
आपण पाहत असतो. हा बदल नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असू शकतो. पण बदल होतच असतो.
आपण या विषयाची रूपरेषा थोडक्यात पाहू या. आपण दोन प्रकारच्या पर्यावरणाच्या संकल्पना बघणार आहोत. त्या आहेत- नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरण. याचबरोबर परिस्थितीकी (इकोसिस्टीम) ही संकल्पनाही आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपण पर्यावरण व समाज यांचा परस्पर संबंध हा विविध दृष्टिकोनातून अभ्यासणार आहोत. यात प्रामुख्याने उत्क्रांतिवाद आणि पर्यावरणवादी दृष्टिकोन, तंत्रज्ञानात्मक बदल बघणार आहोत. तसेच समाज, तंत्रज्ञान व पर्यावरण यांचे परिणामही अभ्यासणार आहोत. पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि निसर्ग याविषयी जाणून घेणार आहोत.