बाजिंद मराठी कादंबरी
बहिर्जी नाईक यांची कहाणी
बहिर्जी नाईक यांची कहाणी – रायगड च्या डोंगरदरीत “धनगरवाडी” हे खुप जुने गाव. सखाराम चा जन्म याच गावचा.
शिवाजी महाराजांनी रायगड स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला आणि आसपास च्या छोट्या छोट्या खेड्यांचं सोनं झाला. जीवन स्थिर झालं. नाहीतर कोण कुठला विजापूर,दिल्लीचा बादशहा कुठल्या सरदाराला पाठवून गावाची राखरांगोळी करेल सांगता येत नव्हते.
रायगड किल्ल्यावर “टकमक” टोक नावाचा एक प्रचंड सुळका आहे,या सुळक्यापासून खाली हजारो फूट खोल दरी असायची. स्वराज्याशी हरामखोरी करणारे फितूर याच टोकावरुन खाली पाताळात ढकलून दिले जायचे.
टकमकाच्या बरोबर खाली बाजूच्या १० कोसावर दाट जंगलात धनगरवाडी हे गाव. स्वराज्याशी फितुरी करणारे हरामखोर टकमकावरून खाली फेकले जायचे तेव्हा हजारो फूट खाली धनगरवाडी जवळ पडायचे.
अक्षरश चिखल व्हायचा त्यांच्या देहाचा..!
काही दिवस कोलह्या कुत्र्यांची मेजवानी झाली,पण जंगली जनावरांचा सुळसुळाट झाला त्या मुळे..!
जंगलातील जनावरं माणसाच्या रक्ताला चाटवली आणि मग जेव्हा टकमकावरून कोणी हरामखोर खाली येईना, त्यावेळी भुकेने कासावीस असणारी जनावरे शेजारच्या धनगरवाडीत हल्ले करु लागली..!
शे दोनशे घरट्यांचे गाव त्यामुळे भयभीत झाले. मग गावचा कारभारी असलेला सखाराम हे गाऱ्हाणे घेऊन रायगडावर सरकारी दफ़्तरी सांगायला जायला निघाला. सोबत पाच दहा जोडीदार सोबत घेऊन दिवस उगवायला घरातून बाहेर पडायच्या बेतात होता.
सखाराम च्या दोन बायका होत्या,राधिका आणि अंबिका. दोघींचा पण सखाराम वर जीव होता. राधिकेला मूल बाळ नसल्याने पाचाड पलीकडच्या धनगरवाडी वरच्या नातलगांची मुलगी अंबिका त्या घरात सखाराम ची कारभारीन बनून आली.
अंबिका ला मुलगा झाला.
वंशाला दिवा झाला म्हणून आवडीने बाळकृष्ण नाव ठेवले. शिवाजीराजे रायगडावर राज्याभिषिक्त झाले त्याच दिवशी बाळकृष्णाचा जन्म झाला म्हणून सारी धनगरवाडी हरखून गेली होती.
बाळकृष्णाला बाळ्या म्हणून सगळी हाक मारत होती. बघता बघता बाळ्या ७ – ८ वर्षाचा झाला होता. बाळ्याचे वडील सखाराम अंगापिंडांने मजबूत गडी. शेजार च्या वाड्या वस्त्यात सर्वांच्या मदतीला धावून जाणारा सखाराम कारभारी म्हणूनच काम करत होता. गावातील सारे लोक धनगर. मेंढ्या,शेळ्या चरायला नेणे,कोंबड्या पाळणे,जंगलातून लाकूड तोडून आणणे हा सर्वांचा प्रमुख उद्योग. गावातल्या ज्या कुटुंबाकडे शेळ्या मेंढ्या जास्त तो गावचा सावकार माणूस. सखाराम कडे ७०० मेंढ्या, ३००शेळ्या आणि २०० कोंबड्या होत्या.
सर्वात जास्त जीतराप असल्याने तो गावचा सावकार पण होता.पण गेल्या५-६ वर्षात बादशाही आक्रमणे महाराजांच्या मुळे बंद झाली,पण टकमक वरुन खाली येणारी मढी हे नवे दुखणे रायगड परिसराला जडले होते. वर स्वर्गात डोके खुपसून महाराष्ट्राला सुखी करणारा रायगड,खाली मात्र नरक यातना देत असे.
कित्येक वेळा अनेकांनी रायगड वर जाऊन ही बातमी सांगितली होती,पण दखल घ्यायलाच कोणी नव्हता, म्हणून सखाराम हे गाऱ्हाणे घेऊन खुद्द महाराजांना भेटायला निघाला होता. त्याचे कारण पण गंभीर होते…!
“पावसाळा नुकताच संपला होता,सारा रायगड परिसर हिरवागार शालू नेसून नटल्यासारखा झाला होता. जनावरांना खायला प्यायला वैरण पाणी मोप मिळत होते. सखाराम चा बाळ्या सकाळी उठून टकमकाच्या खाली शेळ्या घेऊन जायला निघाला होता.
सखाराम ने त्याच्या सोबतीला घरचा नोकर पांडू ला पाठवून दिले..! परवाच्या मध्यरात्रीला टकमकाच्या बाजूने एका माणसाच्या जिवाच्या आकांताने किंचळण्याच्या आवाजाने सारा वाडा जागा झाला होता. अजून एक मराठेशाहीचा फितूर,गद्दार बहुतेक टकमकवरून खाली आला असणार हा अंदाज सर्वांनी बांधला होता,सकाळी जाऊन सखाराम पाहून आला होता,पण ते मढ कुठं नजरेस पडलं नव्हतं.
त्या दिवशी बाळ्या शेळ्या हिंडवायला गेला होता,माघारी येता येता संध्याकाळ होत आली आणि दाट जंगलात भुकेने व्याकुळ दोन बिबळ्या वाघ ते परवाच मढ तोडून खात होते,हे दुरुनच पाहून बाळ्याला घेऊन पांडू वाड्याकडे धावत सुटला,तितक्यात एका फांदीला पाय अडकून पांडू खाली पडला आणि मावळतीच्या बाजूला एक काळाकिभिन्न मनुष्य हातात मजबूत काठी घेऊन,गळ्यात चांदीची पेटी घालून पांडू आणि बाळ्या कडे पाहून हसत उभा होता…!
पांडू आणि बाळ्या धडपडत उठले. शेळ्या,मेंढ्या तिथेच सोडून जीवाच्या आकांताने धावू लागले.धापा टाकत ते वाड्यात पोहोचले आणि जोरजोरात सखाराम कारभाऱ्याला हाक मारू लागले . त्यांचा आरडाओरडा ऐकून सारे गाव एकत्र जमा झाले.घडलेली हकीकत त्यांनी सखाराम ला सांगितली. सखाराम आणि गावकार्यांनी आता हि गोष्ट रायगडावर जातीने सांगून याचा बंदोबस्त केला पाहिजे असे मनोमन योजले होते.
सर्व गावकर्यांच्या मनात भीतीने काहूर माजले होते.काहीही करून या जनावरांचा बंदोबस्त झालाच पाहिजे असे सर्वाना वाटले.
रात्री झोपताना बाळ्या अंबिका आईला घडलेली सर्व कहाणी सांगू लागला,आणि सांगता सांगता त्याला एकदम आठवले कि आपण जिथे फांदीत पाय अडकून पडलो होतो तिथे एक काळाकभिन्न माणूस आपल्याकडे पाहत उभा होता.
त्याने हि हकीकत सखाराम ला सांगितली.
निर्मनुष्य टकमक दरीच्या खाली,आपल्या वाड्यावरच्या मेंढपाळ गड्याव्यतिरिक्त दुसरा मनुष्य कसा येऊ शकतो याचे सर्वाना नवल वाटले.
असेल कोण तरी गुराखी,जो वाट चुकून तिथे आला असावा असे म्हणत सखाराम ने विषय टाळला आणि सकाळीच रायगड च्या वाटेला निघायचे असे ठरवून सोबत कोणाकोणाला न्यायचे हे जाहीर करत सर्वाना तयारीचे आदेश दिले.
वाड्यावरचे सखाराम चे लहानपणाचे मैतर मल्हारी,सर्जा आणि नारायण याना घेऊन जायचे नक्की केले.
तिघेही अंगाने मजबूत आणि एका विचाराचे होते.सखाराम वर त्यांचा फार जीव होता.सर तयारी झाली आणि ती रात्र भूतकाळात जमा झाली.
▶सकाळच्या पहिल्या प्रहरी कोंबड्याने पहिली बांग दिली.
सखाराम च्या दोन्ही कारभारनी लौकर उठून स्वयंपाकाला लागल्या.
पहाटेच्या धुक्यात रायगड खूपच सुंदर दिसत होता.टकमकापासून वरचा सारा भाग धुक्यात झाकून गेला होता.
दुरून पहिले कि एखादा पैलवान कानाला पांढरी कानटोपी घालून बसल्या बसल्या गुडघ्यात मान खुपसून डुलकी मारत आहे असा भास होत होता.
राधिका आईने कोंबड्याची डालगी (खुराडी) चे झाकण काढले आणि आत विसाव्या घेणाऱ्या कोंबड्या बाहेर पडल्या..आणि मग त्या कोंबड्यांचे आवाज ऐकून गावातील इतर घरातील खुरुडे जोरात ओरडू लागली.
सखराम ने भरडलेल्या नाचणीच्या पोत्यातून काही नाचणी काढून अंगणात टाकली तशी कोंबड्यांचे थवे त्यावर तुटून पडले.
लहान लहान कोंबड्या तर सखाराम च्या खांद्यावर,डोक्यावर बसल्या.सखाराम ने त्या बाजूला करत अजून काही नाचणी टाकली.
समोरच्या शेळ्यांच्या कुंपणात शेळ्या,मेंढ्या सुध्दा आशेने त्याच्याकडे बघत होत्या.
समोर असलेली गवताची गंजी सोडून त्यांच्याही चारा पाण्याची सोय केली.
गोठ्यातला गाई,म्हैशी,बैल सर्वाना चारा टाकला.
एव्हाना तांबड फुटायला लागले होते.
सोबत येणारे मैतर अंगावर घोंगड,खायला भाकर्या बांधलेली झोळी आणि कुर्हाड घेऊन सखाराम च्या दारात हजर झाली.
सखाराम ने न्याहारी आटपली आणि कपाळाला भंडारा लावत त्या साथीदारांच्या कपाळी सुधा भंडारा लावला आणि राधिका,अंबिका ला सांगून जायला निघाले.नारळाच्या काथ्यापासून बनवलेले जाड गोणपाट निमुळते करत पावसापासून वाचण्यासाठी त्याचे गोंचे करून चौघांनी डोक्यावर घेतले होते.
एव्हाना बारीक रिमझिम पाउस सुरूच होता.
सोबत असावा म्हणून एक घोडा चौघात घेतला आणि त्यावर आणलेले जेवणाची थैली बांधत सखाराम ने एकवार टकमक टोकाकडे पाहिले.
सखाराम ला आठवले कि शेवटच्या वेळी ‘शिवाजीराजे भोसल्यांच्या’ राज्याभिषेकाला रायगडावर जाऊन खुद्द महाराज पहिले होते.सरसर भूतकाळ त्याच्या नजरेपुढे येऊ लागला.
आजवर ज्याच नुस्त नावच ऐकून लहानाचा मोठा झालो तो शिवाजी त्या दिवशी राजा झाला होता.
जावळीच्या मोरे आणि पुण्याच्या भोसल्यांच्या दंग्यात रायरी परिसर एककाळी हादरून गेला होता.महाबळेश्वर पासून ते महाड पर्यंतचा पूर्ण दाट जंगल जाळीचा पट्टा जावळीकर मोऱ्यांच्या ताब्यात होता.काय घडले देव जाणे पण एके दिवशी भगवे झेंडे घेतलेले हजारो हशम रायगडला भिडले आणि तेव्हापासून ते आजवर कधीही रायगड परिसराला अवकळा लागली नव्हती.सर्व काही आनंदात होते.
शिवाजी महाराजांनी पाण्यासारखा पैसा ओतून हा रायरीचा किल्ला ‘रायगड’ केला होता.
त्यावेळी आमच्या वाड्यानेच जंगलातल्या वाटा,चोरवाटा महाराजांच्या फौजेला दाखवून दिल्या होत्या.
आणि एक दिवस महाराज राजे झाले होते.
मुठीत मावेल तितके सोन महाराज सर्व रयतेला वाटत होते..एक नाहीतर दोन क्षण त्या महाराष्ट्राच्या महादेवाचे दर्शन झाले होते..!
टकमकाकडे पाहत सखाराम हे सारे आठवत होता.
सर्वजन जायला निघाले.
वाड्यापासून टकमकाच्या खालूनच रायगडाच्या ‘चीत’ दरवाज्याकडे जायला वाट होती.वाटेत महाराजांचे मोर्चे,मेटे होतेच,पण ह्या असल्या मुसळधार पावसात तिथ कोण असेल का नाही सांगता येणार नाही.
मल्हारी,सर्जा,नारायण आणि सखाराम हे चौघे त्या वाड्यातून चालू लागले.
वर रिमझिम पाउस होता ,पण गोंच्यामुळे डोक्याला न लागला बारीक तुषार तोंडावर पडत होते.
जेवण भिजू नये म्हणून त्यावर घोंगडे टाकले होते.
मल्हारी ने घोड्याचा लगाम पकडला होता आणि हे चौघे चिखल तुडवत टकमक दरीकडे चालत जात होते.
साधारण दोन प्रहर चालून झाले.सूर्य चांगलाच वर आला होता.
१-२ कोसावर टकमक दरी येईल असा अंदाज लागला आणि चौघांच्याही अंगावर शहरा आला.
एक प्रकारची अनामिक भीती होती मनात.
आजवर इतकी माणसे वरून खाली आली ,काय झाले असावे त्यांचे ?
माणूस मेल्यावर नक्की जातो कुठे …आणि इतक्या वरून पडल्यावर किती बेकार जीव जात असल एकेकाचा..!
चोघांच्याही डोक्यात अनामिक भीती होतीच….आणि तितक्यात टकमकावरून आणखी एक आकाशपाताळ भेदणारी जीवघेणी किंचाळी ऐकू आली..!
चौघेही सावध होऊन वर पाहू लागले तर त्याना दिसले कि टकमकावरून आज आणखी कोणाला तरी कडेलोट झाली आहे..!
भीतीने सर्वांग थरारून उठले होते….कमी आवाज…हळूहळू मोठा झाला आणि अवघ्या काही अंतरावर धड्ड असा आवाज करत जंगलाच्या दाट जाळीत ते मढ पडलं आहे याचा चौघानाही अंदाज आला…..चौघेही एकमेकाकडे पाहू लागली.
खूप विचार करून उसन्या आवसानान सखाराम बोलला…..गड्यानो…आपण ते कोण आहे बघून येउया का र…?
क्रमशः बहिर्जी नाईक यांची कहाणी बाजींद भाग १
संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे
लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव